रोमकरांस 9

1मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. पवित्र आत्म्याने बोध केलेला माझा विवेक मजविषयी साक्ष देतो 2की, मला मोठे दु:ख आहे आणि माझ्या अंतःकरणात सतत वेदना आहेत. 3कारण माझे भाऊ, वंशाने माझे नातेवाईक यांच्याकरिता शापित व्हावे आणि ख्रिस्तापासून मी वेगळा केलेला असावा अशी मी इच्छा करतो. 4इस्राएली कोण आहेत? ते देवाचे निवडलेले लोक आहेत. या लोकांकडे देवाचे गौरव आणि देवाने त्यांच्याशी केलेला करार आहे. देवाने त्यांना नियमशास्त्र दिले. आणि उपासना करण्याचा योग्य मार्ग दिला. आणि देवाने त्यांना त्याचे अभिवचन दिले आहे. 5त्यांचे पूर्वज थोर आहेत. मानवी दृष्टीने सांगताना ख्रिस्त त्यांच्यापासून आला, जो सदासर्वकाळ सर्व लोकांवर धन्यवादित देव आहे. आमेन. 6परंतु देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही. कारण सर्व जण जे इस्त्रएलापासून आले आहेत ते खरोखरच इस्राएली आहेत असे नाही. 7याचा अर्थ असाही नाही की, ते अब्राहामापासून आलेले आहेत, म्हणून खरोखरच ती अब्राहामाची मुले आहेत, तर देवाने म्हटल्याप्रमाणे, “इसहाकाच्या वंशातील लोकांना तुझे संतान म्हटले जाईल.” 8म्हणजे देहदृष्ट्या जन्मली ती देवाची मुले आहेत असे नाही तर वचनाच्या मुलांना संतान म्हटले आहे. 9“नेमलेल्या वेळी मी परत येईन त्यावेळेला सारेला पुत्र होईल.” आणि हे ते वचन आहे. 10इतकेच नव्हे तर रिबेकासुद्धा एकाकडून म्हणजे आपला पूर्वज इसहाक याच्याकडून गरोदर झाली. 11मुले जन्माला येण्यापूर्वी आणि त्यांनी काही बरे किंवा वाईट केले नव्हते, तेव्हा निवडीवरुन असणारा देवाचा पूर्वसंकल्प कायम राहावा, म्हणजे कर्मावरुन नाही तर बोलावणाऱ्याच्या इच्छेवरुन घडावे. 12म्हणून तिला सांगितले होते की, “वडील धाकट्याची सेवा करील.” 13पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “मी याकोबावर प्रेम केले आणि एसावाचा द्वेष केला.” 14तर मग आपण काय म्हणावे? देवाच्या ठायी अन्याय नाही. आहे काय? खात्रीने नाही. 15कारण तो मोशेला म्हणाला, “ज्याच्यावर मला दया करायची त्यावर मी दया करीन, आणि ज्याच्यावर करुणा करायची त्याच्यावर करुणा करीन.” 16म्हणून ते इच्छा करणाराऱ्या वर किंवा पाळणाऱ्यावर नव्हे तर दयाळू देवावर अवलंबून आहे. 17कारण पवित्र शास्त्रात देव फारोला म्हणाला, “याच हेतूसाठी मी तुला उच्च केले यासाठी की मी तुझ्यामध्ये आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर गाजविले जावे.” 18म्हणून देव ज्याच्यावर दया करायची त्यास दया करतो आणि ज्यास कठीण करायचे त्यास कठीण करतो. 19तुमच्यापैकी एखादा मला म्हणेल, “देव जर आमच्या कृति नियंत्रित करतो तर तो अजूनही आमचे दोष का काढतो? शेवटी त्याच्या इच्छेला कोण विरोध करील?” 20होय, हे मानवा, देवाला उलट उत्तर देणारा तू कोण आहेस? जे घडले आहे ते घडणाऱ्याला, “तू मला असे का केलेस” असे विचारील काय? 21एका ठराविक गोळ्यापासून एक भांडे गौरवासाठी आणि एक भांडे अपमानासाठी करावे असा कुंभाराला मातीवर अधिकार नाही काय? 22परंतु देवाला जरी त्याचा राग आणि सामर्थ्य व्यक्त करावेसे वाटत होते, तरी त्याने जी माणसे नाशासाठी नेमलेली होती, त्यांचे मोठ्या धीराने सहन केले नाही काय? 23जी त्याच्या दयेची पात्रे होणार होती, त्यांना त्याने गौरव मिळण्यासाठी तयार केले, त्यांचे त्याने सहन केले यासाठी की त्यांना त्याच्या दयेची विपुलता कळावी. 24ज्या आपणांला त्याने फक्त यहूद्यांतूनच नव्हे तर विदेशातूनही बोलाविले होते. 25होशेयाच्या ग्रंथात पवित्र शास्त्र सांगते, “जे माझे लोक नव्हते, त्यांना मी माझे लोक म्हणेन. आणि ज्या स्त्रीवर प्रीति केली नव्हती तिला प्रिय म्हणेन.” 26“आणि असे होईल की, जेथे ‘तुम्ही माझे लोक नाहीत’ असे म्हटले होते तेथे त्यांना जिवंत देवाची मुले म्हणण्यात येईल.” 27आणि यशया इस्राएलाविषयी असे ओरडून सांगतो की, “जरी इस्त्राएलाविषयी मुलांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली तरी त्यांच्यातील फक्त थोडेच तारण पावतील. 28कारण पूर्ण करुन व आटोपते घेऊन प्रभु पृथ्वीवर आपला शब्द अंमलात आणील.” 29आणि जसे यशयाने पूर्वी सांगितले होते, “जर सेनाधीश परमेश्वराने आम्हांसाठी बीज राहू दिले नसते तर आम्ही सदोम आणि गमोरासारखे झालो असतो.” 30तर मग आपण काय म्हणावे? आम्ही असे अनुमान काढतो की, जे यहूदीतर देवाला अपेक्षित असलेल्या नीतिमत्वाच्या मागे लागले नव्हते त्यांना त्यांचे न्यायीपण विश्वासाचा परिणाम म्हणून मिळाले. 31परंतु इस्राएल लोक जे नियमशास्त्राच्या पालनातून मिळणाऱ्या नीतिमत्वाच्या मागे लागले होते त्यांना नियमशास्त्र मिळाले नाही. 32का नाही? कारण ते हे नीतिमत्व विश्वासाने नाही तर त्यांनी केलेल्या कर्मांनी मिळेल असे समजून त्याच्या मागे लागले होते व ते अडखळण्याच्या दगडावर ठेचाळले. 33पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे. “पाहा मी सीयोनात अडखळण्याचा दगड आणि अपाय करणारा खडक ठेवतो. परंतु जो त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.”


Copyrighted Material
Learn More

will be added

X\